सातगाव पठार भागात पाण्याचा प्रश्न गंभीर   

मंचर,(प्रतिनिधी): आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात सध्या जनावरांच्या चार्‍याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, सातगाव पठार भाग हा पावसावरच अवलंबून असल्याने ऐन उन्हाळ्यात विविध समस्यांचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत आहे. सातगाव पठार भागातील शेतीसाठी कलमोडी योजनेची घोषणा झाली. पण अजून जवळपास २७ वर्षे उलटून गेली तरी शेतीला पाणी नाही. त्याचबरोबर पाणी तर दूरच पण सत्तावीस वर्ष कलमोडी सिलिंगचे शिक्के मात्र शेतकर्‍यांच्या माथी बसले आहेत.खेड तालुक्यात कळमोडी धरण झाले. परंतु त्या पाण्याचा उपयोग आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील शेतकर्‍यांना झाला नाही. त्यामुळे कळमोडी धरण मृगजळ ठरल्याची भावना तयार झाली आहे.
 
 सातगाव पठार (ता.आंबेगाव) येथील शेती ही प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर केली जाते. त्यामुळे आठमाही शेती ऐवजी सातगाव पठार भागातील शेती ही फक्त खरीप आणि रब्बी हंगामा पुरतीच मर्यादित राहते. उन्हाळ्यामध्ये शेतीला पाणी नाहीच पण प्यायच्या पाण्याची टंचाई जाणवते.पठारावर जिकडे तिकडे शेती ही नांगरून पडलेली दिसून येते. सातगाव पठार भागाचे भौगोलिक क्षेत्र ६८७३ हेक्टर एवढे आहे. त्या पैकी विहिती क्षेत्र ५८१९ हेक्टर एवढे आहे.
 
उन्हाळ्यामध्ये सातगाव पठार भागातील विहिरी यामधील पाणी जवळ जवळ संपुष्टात येऊन पाण्यासाठी सातगाव पठार भागातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर किंवा ग्रामपंचायतच्या नळ योजनेवर अवलंबून रहावे लागते. ग्रामपंचायतच्या नळ योजनेला सुद्धा रोज पाणी न सोडता आठवड्यातून दोन वेळा पाणी फक्त सोडले जाते. सातगाव पठार भागातील सर्वात मोठे गाव असलेले पेठ मध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. 
 
पेठला सार्वजनिक नळाद्वारे सोडले जाणारे पाणी हे इंदिरा पाझर तलाव या खेडघाटातील तलावा शेजारी घेतलेल्या विहिरीतून आणले जाते. पण सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता ग्रामपंचायतीने तीन दिवसानंतर नळाला पाणी सोडते. अनेक नागरिकांना खासगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. चार हजार लिटर पाण्याचा टँकर हा साधारणपणे १ हजार १०० रुपयापर्यंत तर दहा हजार लिटर पाण्याचा टँकर हा घेण्यासाठी नागरिकांना २ हजार ५०० ते ३ हजार रुपये मोजावे लागतात. 
 
सातगाव पठार उंचावर असल्यामुळे अन्य भागाप्रमाणे कॅनॉॅल किंवा पाण्याचा इतर स्रोत पठाराला उपलब्ध होत नाही. सातगाव पठार भागातील शेतीसाठी कलमोडी योजनेची घोषणा झाली. पण अजून जवळपास २७ वर्षे उलटून गेली तरी शेतीला पाणी नाही. त्याचबरोबर पाणी तर दूरच पण सत्तावीस वर्ष कलमोडी सिलिंगचे शिक्के मात्र शेतकर्‍यांच्या माथी बसले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी शेतकरी हवालदिल झाला आहे.
 
सातगाव पठार भाग हा उंचावर असल्यामुळे शाश्वत अशी कोणतीही पाणी योजना नाही. त्यामुळे जमिनीची भूजल पातळी प्रचंड प्रमाणात खालवलेली आहे. अनेक शेतकरी विहिरींना पाणी लागेल या हेतूने विहिरीची खोली वाढवताना दिसून येत आहे.अगदी पठारावर ८० ते ९० फुटापर्यंतच्या विहिरी सुद्धा झालेले आहेत. पण म्हणावे असे पाणी नाही. त्यामुळे बोरवेल आणि विहिरीसाठी केलेला आर्थिक भुर्दंड शेतकर्‍यांना सहन करावा लागतो. 
 
- रामशेठ तोडकर, माजी सरपंच, पेठ
 
वेळ नदीचा उगम हा वेळेश्वर या ठिकाणी झाल्यामुळे आणि उगमस्थान जवळच असल्यामुळे वेळ नदी फक्त ही पावसाळ्यातच वाहते. सातगाव पठार भागातील वेळ नदीवर कोल्हापुरी पद्धतीचे नऊ बंधारे आहेत. पावसाळ्यामध्ये हे बंधारे पाणी अडवण्याचे काम करतात. या बंधार्‍याचा उपयोग फक्त रब्बी हंगामा पुरताच होताना दिसून येत आहे. उन्हाळ्यामध्ये नदी आणि कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे कोरडी ठाक पडलेली असतात. 
 
- अशोकराव बाजारे, उद्योजक, सातगाव पठार
 
सातगाव पठार भागातील कुरवंडी, कोल्हापूर, भावडी, कारेगाव, पेठ व पारगाव तर्फे खेड या गावांमध्ये दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते. पेठ प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झालेले आहे. सातगाव पठार भागातील लोकसंख्या २० हजाराच्या जवळपास आहे. महावितरण या योजनेला विद्युत पुरवठा केला तर ऐन उन्हाळ्यामध्ये पिण्याचे पाणी सातगाव पठार भागाला उपलब्ध होऊ शकते. 
 
- संजय पवळे, सरपंच, ग्रामपंचायत पेठ
 
पठार भागामध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे जनावरांना दूरवरून पाणी आणावे लागते. तसेच अति उन्हामुळे आणि हिरवा चारा उपलब्ध नसल्यामुळे जनावरांना कोरडा चारा द्यावा लागतो. त्यामुळे दूध उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता तसेच चरण्यासाठी चारा उपलब्ध नसल्यामुळे जनावरांना गोठ्यातच कोरडा चारा खायला घालायला लागतो.
 
- अशोक राक्षे, गो-पालक शेतकरी पेठ
 

Related Articles